Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh Case : संतोष भैय्याला न्याय मिळेपर्यंत एकही मराठा मागे हटणार नाही. कुणाच्याही बापाला येऊ द्या. मात्र मॅटर मी कधीही दबू देणार नाही, असे मनोज जरांगेंनी ठामपणे सांगितले आहे.
Manoj Jarange Patil : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये (Beed) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता डॉ. आंबेडकर चौकातून मोर्चा निघणार असून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने आजचा मोर्चा आहे. संतोष भैया देशमुख यांच्या लेकीने हाक दिली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व बांधवांना आणि सगळ्या मराठ्यांना विनंती आहे की, एकानेही घरी थांबू नये. सरकारला या मोर्चामुळे जाग येईल. नाही आली तर आम्ही त्यांना जाग आणणार आहोत. संतोष भैय्याला न्याय मिळेपर्यंत एकही मराठा मागे हटणार नाही. कुणाचाही बाप आला तरी मॅटर मी कधीही दबू देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
गृहमंत्र्यांनी हलगर्जीपणा करू नये
यात राजकारण करू नये, मग महायुती किंवा महाविकास आघाडी असो, कुणीही राजकारण करू नये. लाजा वाटू द्या. तुमच्या दोघांमुळेच हाल होऊ लागले आहेत. काही मंत्री आहेत, काही विरोधी पक्षातले आहेत. विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप करणे बंद करा. संतोष भैय्याचा खून झाला आहे, याचं राजकारण सत्ताधारी आणि विरोधकांनी करू नये. गृहमंत्र्यांनी यात हलगर्जीपणा करू नये. आरोपींना लवकर सापडून आणा, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.
मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत
आरोपी 24-24 तासात सापडत असतो. तुम्हाला 19 दिवस सापडत नाही याचा अर्थ मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत. आरोपींना सांभाळण्याचं काम ते करत आहेत, असा आरोप त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या कुणाचा खून झाला असता तर त्यांना झोप आली असती का? तुमची कोणी ताई असती तर दोन्ही उपमुख्यमंत्री झोपले असते का? असा सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केला.
राज्यभर मोर्चे काढणार
सत्ताधाऱ्यांनीच आरोपींना लपवून ठेवला आहे का? अशी शंका येत आहे. आता हे आंदोलन राज्यभर पसरणार आहे. राज्यभर आम्ही मोर्चे काढणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील मराठ्यांनी मोर्चाच्या तयारीला लागा. राज्यभर मोर्चे सुरू करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले. सरकार आल्यापासून मुलींचे खून होऊ लागलेत. तुम्ही आल्यापासून खंडण्या मागू लागलेत. निवडणुकीत खूप खर्च सुरू आहे का? गुंडाच्या हाताने राज्य चालवायचे आहे का? गृहमंत्री याकडे का लक्ष देत नाहीत? असा सवाल देखील मनोज जरांगे यांनी उपस्थित केला.